जळगाव – राठा आरक्षण त्वरित द्यावे मागणीसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठींबा देण्यासाठी जळगाव येथे सकल मराठा समाजातर्फे कँडल मार्च कढण्यात आला.यावेळी मोठया संख्येने समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.
जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजातर्फे मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डी. डी. बछाव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ”आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, समाजातील मुले चांगले गुण मिळवूनही त्यांना संधी न मिळाल्याने ते मागे पडत आहेत. राज्यातील सरकार मराठ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे.
याचबरोबर ”मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून सरकार त्याकडेही लक्ष देण्यास तयार नाही. शासन केवळ वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध करीत आहोत. तसेच त्वरित आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करीत आहोत.” असंही बछाव म्हणाले.
यावेळी एक मराठा लाख मराठा ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध करण्यात आला. तसेच, मेणबत्त्या पेटवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या.
यावेळी सकल मराठा समाजाचे राम पवार,हिरामण चव्हाण, सुनिल गरुड,वाल्मीक पाटील, संजय चव्हाण,यांच्यासह मराठा समाज बांधव,भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.