धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही. मात्र, धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्यामुळे एका चालकाला चौकशी अंती निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत विभाग नियंत्रक भगवान जागनोर यांनी माहिती दिली आहे.

पाचोरा आगारातील चालक गणेश ठाकरे याला एस.टी. महामंडळाने निलंबित केले आहे. २७ मे रोजी सकाळी ७:३० वाजता पाचोरा आगारातून पाचोऱ्याहून जळगावकडे जाणारी बस क्रमांक – एम.एच. १४ बी.टी. २६३४ ह्या बसचा चालक गणेश ठाकरे हा बस चालवत होता. त्याच वेळेला तो मोबाइलवरदेखील बोलत होता. त्याला काही प्रवाशांनी हटकले. त्यानंतर त्याने प्रवासी आणि वाहक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. प्रवाशांशी हुज्जत घातली. तो मोबाईलवर बोलत असतानाचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पांडे यांनी केली होती. ठाकरे याने तब्बल २० मिनिटे फोनवर संभाषण केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यानंतर मुंबई कार्यालयाने जळगाव येथील विभाग नियंत्रकांना सदर चालकाची चौकशी करून कारवाई करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार त्याची चौकशी केली असता तो दोषी आढळून आला. त्यानुसार व प्रवाशाच्या तक्रारीनंतर चालकाला एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh