‘बजेट’ कोलमडले! अर्थसंकल्पाआधीच महागाईचा भडका, एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार आज अंतरिम अर्थसंकल्प 2024 जाहीर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. मात्र अर्थसंकल्पाआधीच महागाईचा भडका उडाला असून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होत असतो. तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ किंवा घट करत असतात. आज गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरची किंमत जाहीर केली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून पुन्हा सर्वसामान्यांना झटका दिला आहे.

ग्राहकांना आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या खरेदीसाठी 14 रुपये जादा मोजावे लागतील. त्यामुळे राजधानी दिल्ली आता व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी 1769.50 रुपये द्यावे लागणार आहेत. आजपासून हा बदल लागू होणार आहे.

प्रमुख शहरांमधील किंमती

दिल्ली – 1769.50 रुपये (आधी – 1755.50 रुपये)

कोलकाता – 1887 रुपये (आधी – 1869 रुपये)

मुंबई – 1723 रुपये (आधी – 1708)

चेन्नई – 1937.50 रुपये (आधी – 1924.50 रुपये)

दरम्यान, गेल्या महिन्यामध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये घट केली होती. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1.50 रुपये ते 4.50 रुपये स्वस्त झाला होता. त्यामुळे मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची 1708 रुपये, तर दिल्लीत 1755.50 रुपये झाली होती.