एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; ..तर अशा चालकांना नोकरी गमवावी लागणार!

एसटी बसचा प्रवास हा सर्वात सुरक्षित मानला जातो. लालपरी ही गोरगरिबांच्या हक्काचं प्रवासाचं साधन आहे. एसटीची प्रवासी संख्या वाढावी, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडाळाकडून विविध योजना राबवल्या जातात.

काही दिवसांपूर्वीच एसटीमध्ये महिलांना अर्ध तिकीट तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत प्रवासी संख्येसोबतच एसटी अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

वाहनाचा अपघात होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असता. ज्यामध्ये एसटीमध्ये तांत्रिक बिघाड, ओव्हर स्पीड अशा विविध कारणांचा समावेश आहे. मात्र वाहनाचे सर्वाधिक अपघात हे मोबाईलमुळे होतात. गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

एसटी बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाची नोकरीही जाऊ शकते. बस चालवताना मोबाईलवर बोलून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांविरोधात राज्य परिवहन महामंडळानं कडक पाउलं उचलली आहेत. मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाची तक्रार करावी असं आवाहन एसटी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. चालकाचे मोबाईलवर बोलतानाचे फोटो ,व्हीडीओ पाठवले तर थेट निलंबणाची कारवाई होणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh