भुसावळ – येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज भालेराव (वय २३) आणि काजल गौतम सपकाळे (वय २०) असं मृतांचे नाव आहे.
या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव याचे काजल गौतम सपकाळे या तरूणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते.
काल म्हणजे शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. दरम्यान, काजलच्या निधनाची वार्ता येताच कुणाल मनोज भालेराव याने थेट तापी नदीचा पुल गाठून तेथून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. संसारवेल बहरण्यापूर्वीच या तरूण युगलाचा करूण अंत झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.