भुसावळ स्टेट बँकेची फसवणूक : सहा कर्जदार जाळ्यात

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी बँकेच्या दोन अधिकृत व्हॅल्यूअरसह 17 कर्जदारांविरोधात गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी रविवार, 24 रोजी दुपारी अटक केल्याने कर्जदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या बँकेत वाटप झालेल्या बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आरोपींना झाली अटक
राजेश निवृत्ती मेहरे, शकील इमाम गवळी, आसीफ हुसेन गवळी, गजानन रमेश शिंपी, निलेश जय सपकाळे, पंकज भोजनराव देशमुख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यांना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार कोण? बोगस कर्ज घेऊन मिळालेले पैसे कोणा-कोणास देण्यात आले ? बनावट कागदपत्र कोणी बनवली? कशी बनवली? या सर्व बाबींचा शोध घेऊन त्यात सामील असणार्‍या पडद्यामागील सर्वांना आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.

चार टीमद्वारे आरोपींच्या आवळल्या मुसक्या
कर्जदारांच्या अटकेसाठी चार स्वतंत्र टीम तयार करण्यात येवून प्रत्येक टीमला तीन आरोपींना अटक करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी रविवारी दुपारी अचानक पथकांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात बोलावत कारवाईचे निर्देश दिल्यानंतर लागलीच पथकांनी आरोपींच्या घरी छापा टाकत संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू व बाजारपेठ व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh