जळगावमध्येही ‘अयोध्या’.या विभागाचे ‘अयोध्या जुने जळगाव’ असे नामकरण; कधी आहे सोहळा?

जळगाव – परिसरात घराघरावर भगवे झेंडे लागले असून रस्त्याच्या कडेला रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाला आहे. या पार्श्वभूमीवर जुने जळगाव परिसराचा ‘अयोध्या जुने जळगाव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तब्बल 500 वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची भव्य राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय व्हावा यासाठी जळगाव शहरातील जुने जळगाव परिसराचे नागरिकांनी ‘अयोध्या जुने जळगाव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रहिवाशांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोहळा साजरा करण्यासाठी महिला, लहान मुले, तरुण तसेच सर्वच नागरिक गेल्या महिन्याभरापासून दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. 22 जानेवारीच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद साजरा करण्याकरीता या परिसरात तब्बल 500 क्विंटलचे भरीत आणि 5100 क्विंटल बुंदीच्या महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तसेच 5 हजार महिला यावेळी शोभायात्रा काढणार आहेत.

साईबाबा मंदिरात 25 टन लाडू तयार

अयोध्यानगरीत भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ठाणे शहर संपूर्ण राममय झाले आहे. रामसेवक माजी खासदार संजीव नाईक आणि रुद्र प्रतिष्ठानच्यावतीने ठाण्याच्या वर्तक नगरातील साईबाबा मंदिरात 25 टन लाडू तयार करण्यात आले आहेत. हे लाडू ठाणे जिल्हा आणि नवी मुंबई परिसरातील नागरिक, सर्व मंडळं आणि मंदिरांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. भाजप आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग सिसोदिया, वर्तक नगर साईनाथ सेवा समितीचे सदस्य आदींच्या उपस्थितीत या लाडू वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh