आशा वर्करांना चोवीस तासांत वेतन अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन

महापालिकेच्या आरोग्य विभागातील आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यांना थकीत वेतन त्वरित अदा करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा आशा वर्कर व गट प्रवर्तक संघाने दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून आशा वर्कर कर्मचाऱ्यांनी काम केले मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही.

मानधन, मोबदला, प्रोत्साहन भत्ता अशा अनेक देयकांपासून ते वंचित आहेत. दिवाळीसारख्या सणात त्यांचे वेतन त्वरित अदा करण्याची गरज आहे. त्यांना चोवीस तासांत वेतन अदा केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे कॉ. विजय पवार यांनी दिला.