आनंदवार्ता! मॉन्सून आज अंदमानात धडकणार; महाराष्ट्रात पुढील आठवड्यात वळीवाच्या सरी येणार

वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. मॉन्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. आज रविवारी मान्सून अंदमानात डेरेदाखल होणार आहे. अंदमानात स्थिरावल्यानंतर 31 मे रोजी तो केरळमध्ये प्रवेश करेल. महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील आठवड्यात वळीवाच्या सरी कोसळणार आहेत. तर 10 ते 12 जूनदरम्यान मॉन्सून महाराष्ट्रात येणार आहे.

मॉन्सूनने गेल्यावर्षी महाराष्ट्रात प्रतीक्षा करायला लावली होती. यंदा मात्र तो दोन दिवस आधीच महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून धो-धो बरणार असून सुमारे 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. मान्सून दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र एक दिवस आधीच 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येत आहे.

मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. मात्र, यंदा 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकत आहे. गेल्या वर्षी मॉन्सून केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला दाखल झाला होता. तर महाराष्ट्रात तो 19 जूनला आला होता. यंदा मॉन्सून महाराष्ट्रात 10 ते 12 जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. गेल्यावर्षी ‘अल निनो’मुळे सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे यंदा 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. आता आठवडाभर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. 27 मेपासून राज्यभरात पूर्व- मोसमी म्हणजेच वळीवाच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh