शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमस्थळांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी; सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव – जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.

अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वडनगरी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून पालकमंत्र्यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. याप्रसंगी उद्योजक अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गिरीष सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मंदीर समितीचे जगदीश चौधरी, सीए हितेश‌ आगीवाल व पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व अशोक जैन यांच्या हस्ते मुख्य सभा मंडपाचे उभारणी कामांचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, शिव महापुराण कथेसाठी जळगाव जिल्ह्यात ६ लाख भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हावासियांनी आयोजकांना‌ सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी वाहतूक नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भोजन, आंघोळीसाठी गरम पाणी याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh