वेळ, तारीख अन् ठिकाणही ठरलं! अजित पवार-शरद पवार येणार आमनेसामने

अजित पवार यांनी रविवारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज राष्ट्र्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कराड दौऱ्यावर गेले असून सकाळपासूनच त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. पुणे ते कराड दरम्यान ठिकठिकाणी शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान काल झालेल्या घडामोडीनंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी पक्षात कोणाच्या पाठीशी किती किती संख्याबळ आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता 5 जुलै रोजी शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शरद पवार यांनी यांनी बुधवार, 5 जुलै रोजी, दुपारी 1 वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडून देखील 5 जुलै रोजीच सर्व समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता 5 तारखेला असणाऱ्या या मेळाव्यांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.