ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा

राजेंद्र महाले

रावेर प्रतिनिधी– रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने हे होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील प्रा.डॉ. डी.बी.पाटील उपस्थित होते. प्रा.डॉ.डी.बी.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिवसा बद्दल सविस्तर माहिती दिली. २४ डिसेंबर १९८६ या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक कायद्याला मंजुरी दिली. म्हणून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयाला ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सहा हक्क मिळालेले आहेत. त्यात सुरक्षेचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यांचा समावेश होतो असे त्यांनी सांगितले. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईट वर ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास आपण ग्राहक हक्क कायद्या अंतर्गत तक्रार करू शकतो असेही ते म्हणाले. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असल्यास ग्राहकांनी तक्रार कुठे करावी, कशी करावी, त्याची पद्धत काय असते या बद्दल जागरूक राहायला पाहिजे. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे तसेच कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यवहाराची तक्रार या कायद्या अंतर्गत करू शकतो असे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.पी.नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. एस.एन.वैष्णव, व्ही.एन. रामटेके, डॉ. पी. आर. गवळी, प्रा.दिलीप सोनवणे सह सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला एकूण ७२ रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.