अहमदाबाद : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान (फ्लाइट क्रमांक AI171) उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच क्रॅश झाले. हे विमान मेघानी परिसरात कोसळले, ज्यामुळे संपूर्ण भागात धुराचे प्रचंड लोळ उसळले आणि आगीचे भयाण रूप दिसून आले.
या विमानात अंदाजे 300 प्रवाशांची क्षमता असून अपघाताच्या वेळी 240 प्रवासी व क्रू सदस्य होते. लंडनच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन भरलेले होते, त्यामुळे कोसळल्यानंतर झालेली स्फोट व आग अधिक तीव्र झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
DGCA (महानिरीक्षक नागरी विमान वाहतूक) यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्याची शक्यता असून बोईंग कंपनीचे तांत्रिक तज्ञ देखील तपासासाठी येण्याची शक्यता आहे.
अपघाताचे कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नसले तरी, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतलेल्या जड इंधनामुळे झालेला स्फोट व आग यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी तसेच अहमदाबाद पोलिस आयुक्त यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.
एअर इंडियाने या दुर्घटनेवर आपले पहिले अधिकृत निवेदन देताना म्हटले आहे, “AI171, अहमदाबाद ते लंडन गॅटविक उड्डाण करणारे विमान आज 12 जून 2025 रोजी एका घटनेत अडकले आहे. आम्ही सध्या घटनेचे तपशील मिळवत आहोत.”