एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करु नये, बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाची मोहीम

राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं मोहीम हाती घेतली आहे.

एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करु नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री करण्यात येऊ नये. घाउक आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांनी एक जूनपूर्वी कापूस बियाणे विक्री केल्यास विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशाराही देेण्यात आला आहे.

…तर विक्रेत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द होऊ शकतो

कापसावरील बोंड अळीचा प्रकोप वाढल्यानं बोंड अळीच जीवनचक्र भेदण्यासाठी कृषी आयुक्तालयानं मोहिम हाती घेतली आहे. बियाणे विक्रेत्यांनी एक जूनपूर्वी कापूस बियाणे विक्री केल्यास विक्रेत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द होऊ शकतो असंही कृषी विभागानं सांगितलं आहे. यंदा बोंडअळीचा प्रकोप पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कपाशीवरील बोंडअळीला पायबंद घालण्यासाठी पूर्व हंगामी कापूस लागवड टाळणे योग्य आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक

कापसाच्या लागवडीत महाराष्ट्र राज्य अग्रक्रमावर आहे. कापसाचे लागवडीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडअळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी 2002 मध्ये बीटी जनुक असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरू झाला. परंतु, बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर सुद्धा दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर उपयोजना केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव पासून होणारे संभाव्य नुकसान कमी करता येईल. गेल्या अनेक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी हे गुलाबी बोंड अळीमुळं अडचणीत आले आहेत. कारण या बोंडअळीमुळं कापूस उत्पादनात मोठी घट होत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा या राज्यातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

एल निनोचा प्रभाव, कापूस उत्पादकांना घाबरण्याची गरज नाही

20 मे पासून पाऊसपूर्व हंगामी कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतजमीनीची नांगरणी, वखरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यंदा हवामान खात्याच्या अंदाजनुसार एल निनोचा प्रभाव वाढून त्याचे दुष्परिणाम म्हणून पाऊस कमी किंवा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जैन उद्योग समूहाचे कापूस तज्ज्ञ बाळकृष्ण जडे यांच्या मते एल निनोमुळं पावसाचा अंदाज काहीही सांगितलं गेला असला तरी शेतकऱ्यांनी लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य पद्धतीने नियोजन करायला पाहिजे असे जडे म्हणाले.

ताजा खबरें