राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार?

राज्यातील शाळांच्या वेळा बदलणारी की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेच्या वेळांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल ५ डिसेंबर रोजी करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल बैस यांनी शाळांच्या वेळाबाबत म्हटलं की, बदलत्या जीवनशैलीमुळे झोपेच्या वेळांमध्येही बदल झाले आहेत. मुलं रात्री उशीरापर्यंत जागीच असतात. त्यानंतर सकाळी लवकर उठून त्यांना शाळेत जावं लागतं. त्यामुळे मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. मुलांना चांगली झोप मिळावी, या शाळांच्या वेळांमध्ये बदल होण्याच्या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे.

राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले की, शिक्षण हे ‘मनुष्य निर्माण’ करणारे असावे, असं स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होते. गरीब मुलगा शिक्षणात येऊ शकत नसेल तर त्याच्याकडे शिक्षण गेले पाहिजे. आजची मुले पुस्तक वाचत नसतील, पण स्मार्ट फोन, इंटरनेट, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून ज्ञान व माहिती घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी पुस्तकांऐवजी ऑडिओ बुक्स, व्हिडिओ बुक्स आणि ई-बुक्सची निर्मिती करावी, असा सल्ला राज्यापालांनी दिला आहे.

ग्रंथालय दत्तक योजना

मुलांना इंटरनेटद्वारे फक्त सुरक्षित आणि चांगली सामग्री मिळावी यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व वाचनालयांना इंटरनेट, संगणक सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे व ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

दप्तराचा भार हलवा व्हावा

शाळांध्ये ई-वर्गांना चालना देण्याची गरज आहे. यातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकाविना शाळेचा विचार करता येईल. गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असं बैस यांनी सूचवलं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh