अभिनेत्री हुनर हालीच्या परवानगीशिवाय पापाराझींनी शूट केलेला व्हिडीओ व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हुनर हाली सध्या एका विचित्र आणि त्रासदायक प्रसंगाला सामोरी जातेय. ‘छल: एक शह और मात’, ‘थपकी प्यार की’, यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहे. परंतु हा व्हिडीओ तिच्या परवानगीशिवाय शूट करण्यात आला असल्याने तिच्या वैयक्तिक गोपनीयतेचा आणि सन्मानाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हुनर काही दिवसांपूर्वी एका ब्युटी सलॉनच्या उद्घाटन कार्यक्रमात सेलिब्रिटी पाहुणी म्हणून पोहोचली होती. यावेळी तिने हॉल्टर टॉप आणि ट्राऊजर असा ड्रेस परिधान केला होता. हा लूक ती सहजपणे कॅरी करत होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा ती रस्त्यावरून चालत होती, तेव्हा हॉल्टर टॉपमध्ये जोडलेली पॅडिंग अचानकपणे खाली घसरली. ती हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतानाच, काही पापाराझींनी तिच्या नकळत व्हिडीओ शूट केला आणि तो थेट सोशल मीडियावर अपलोड केला.

या व्हिडीओवरून सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. काहीजण याला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणत आहेत, तर काही तिच्या कपड्यांवर टीका करत आहेत. या सर्व प्रकारामुळे हुनर खूप संतप्त झाली असून, तिने याविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे.

हुनर हालीची प्रतिक्रिया:

‘टीव्ही9 हिंदी डिजिटल’ या माध्यमाशी बोलताना तिने आपली भूमिका मांडली. ती म्हणाली, “मी त्या पापाराझींना माझा व्हिडीओ शूट करण्याची परवानगी दिली नव्हती. तरीही त्यांनी तो शूट केला. त्यांना हा अधिकार कोणी दिला? मी मुंबईत अनेक वर्षांपासून राहते. हे माझं शहर आहे. इथे माझं स्वातंत्र्य आणि माझा सन्मान जपला गेला पाहिजे. कपडे कोणते घालायचे हे माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मी कोणालाही दुखावणारे कपडे परिधान केले नव्हते. मी जेव्हा पॅडिंग ठीक करत होते, तेव्हा व्हिडीओ शूट करून व्हायरल करणं म्हणजे सन्मानाचा अपमान आहे.”

पब्लिसिटी स्टंटच्या आरोपावर संताप:
हुनर पुढे म्हणाली, “मी अशा गोष्टींना सामान्यतः फारसं महत्त्व देत नाही. पण या वेळी मी माझं मौन तोडलं कारण काही लोक, जे मला ओळखतात, तेही या व्हिडीओला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. मला हे ऐकून धक्का बसला आहे. माझा उद्देश कोणतंही स्टंट करण्याचा नव्हता. मी अनेकांना स्वतःहून मेसेज करून व्हिडीओ हटवण्याची विनंती केली. काहींनी तो हटवला, पण काहीजण अजूनही व्ह्यूजसाठी तो व्हिडीओ ठेवून आहेत. माझ्यावर प्रश्न विचारण्याऐवजी, असा व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर प्रश्न विचारावा.”

टीव्ही इंडस्ट्रीतील 15 वर्षांचा प्रवास:
हुनर हालीने गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत विविध भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय करून रसिकांची मनं जिंकली आहेत. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत कधीच कोणत्याही वादात अडकण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच आज जेव्हा तिच्यावर ‘पब्लिसिटी स्टंट’चा आरोप होतोय, तेव्हा तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

स्त्रियांबाबत संवेदनशीलतेचा अभाव:
या प्रकारातून आणखी एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे स्त्रियांबाबतची सामाजिक संवेदनशीलता अद्याप कमी आहे. कुठली गोष्ट सोशल मीडियावर टाकावी आणि कुठली नाही, याबद्दल अजूनही स्पष्ट जाणिवा अनेकांमध्ये नाहीत. जेव्हा एखादी महिला सार्वजनिक ठिकाणी अडचणीत सापडते, तेव्हा मदतीच्या ऐवजी तिचा व्हिडीओ व्हायरल करणं हे अत्यंत निंदनीय आहे.