कंटेनर-आयशरचा समोरासमोर अपघात; गुरांचे व्यापारी जागेवरच ठार; जळगावमधील घटना

जळगाव – देशात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण एखाद्या आजारापेक्षा जास्त असू शकेल. राज्यात रोज कुठे ना कुठे अपघातात लोकांची जीव जात आहेत. काही घटना अशा असतात ज्यामुळे बघणाऱ्याचा थरकाप उडतो.

असाच एक अपघात जळगाव जिल्ह्यात घडला आहे. एरंडोल ते पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 येथे सावखेडा होळ गावाजवळ भरधाव कंटेनर आणि आयशर टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

या अपघातात आयशरमधील इसम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. यात आणखी 5 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून पारोळा पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.

कसा घडला अपघात?

रोहिदास परसराम चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. घरातील तो कर्ता पुरुष होता. बैल खरेदी-विक्री करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रोहिदास चव्हाण हे धुळे येथून जामनेरकडे बैल खरेदी करून आयशर वाहनाने परत येत असताना पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावाजवळ गोशाळेसमोर एरंडोलकडून धुळेकडे जाणाऱ्या कंटेनरने त्यांच्या आयशरला जोरदार धडक दिली. या धडकेत आयशरचालक, कंटेनरचालक आणि आयशरमध्ये बसलेले रोहिदास चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता त्यात रोहिदास यांना मयत घोषित करण्यात आले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. तर घटनेत आणखी 5 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांच्यावर पारोळा शासकीय रुग्णालय, एरंडोल व धुळ्यात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh