आरक्षणावर तोडगा निघणार? बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना निमंत्रण ; कुणबी दाखला मिळणार?

मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. जालन्यात उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी येत आहेत. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे.

बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगेंनाही या बैठकीस बोलविण्यात आले आहे.

दुपारी बारा वाजता ही बैठक होत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आजच घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीतील निर्णयाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आजपासून त्यांनी अन्नपाणी त्याग आंदोलनास सुरवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

ताजा खबरें