ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांना बायोमॅट्रीक प्रणाली लागू करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मागणी. 

जळगाव-:महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील पत्र क्र. संकीर्ण- २०२२/ प्र.क्र.८६७/आस्था-७ ची अंमलबजावणी तात्काळ होणेबाबत. भ्रष्ट्राचार निवारण समिती तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांचेकडे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

५ जानेवारी २०२३ च्या पत्रानुसार सर्व विभागीय आयुक्त सो. यांना उद्देशून कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी सदरचे पत्र दिलेले आहे. त्यात ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना बायोमॅट्रीक प्रणाली लागू करणे व ग्रामसेवक कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर जनमाहिती अधिकारी फलक लावणेबाबत श्री. गोविंद शंकर कामतेकर यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे.

सदर ची बायोमॅट्रीक प्रणाली जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांच्यासाठी कार्यान्वित करण्यात यावी जेणेकरून कामचुकार कर्मचाऱ्यांना चपराक बसेल. बर्‍याच गावांमध्ये ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे कामाच्या ठिकाणी राहात नसल्याने त्यांना कर्तव्यावर यायला उशिर होतो किंवा काही कर्मचारी हे ठराविक दिवसच कार्यालयात हजर राहतात. अश्या कामचुकार कर्मचार्याना योग्य शिस्त लावण्यासाठी बायोमॅट्रीक प्रणाली लागू करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे झालेले आहे.

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे जर वेळेवर कर्तव्यावर हजर राहिले तर सामान्य नागरिकांना ज्या ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागतात त्या कमी होतील. सर्व सामान्य जनतेची कामे लवकरात लवकर होतील. त्यामुळे लवकरात लवकर बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी व जनतेला न्याय देण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.