माझे दोन बारके बारके भाचे…’; नारायण राणेंच्या होमपीचवर सुषमा अंधारेंची फटकेबाजी

सिंधुदुर्ग : महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या यांनी कणकवलीत राणेंच्या होमपीचवर आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर टीका केली. सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचे नाव घेताच उपस्थितांनी कोंबडी चोर म्हणून ओरड करायला सुरुवात केली. यानंतर अंधारे यांनी माझे दोन बारके बारके भाचे म्हणत आमदार आणि माजी खासदार निलेश राणे यांचाही आपल्या शैलीत समाचार घेतला.  ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कणकवलीत श्रीधर नाईक चौकात सभा झाली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या स्लाईड दाखवत त्यांची काँग्रेस, स्वाभिमान संघटना, आणि आता भाजपामध्ये आल्यानंतर त्यांची वक्तव्ये कशी बदलत गेली हेच लोकांसमोर दाखवले. अंधारे यांनी प्रोजेक्टरवर नितेश राणे यांचे सावरकरांबाबतचे जुने ट्विट दाखवत त्यांच्या इंग्रजी लेखनाचा अनुवाद लोकांसमोर मांडला. सावरकर यांनी ब्रिटिशांसमोर चार वेळा माफी मागितली असा माणूस युवकांचे प्रेरणास्थान होऊ शकत नाही, हे ट्विट करणारे आपले बोलके लेकरू नितेश राणे आहे, असे सांगतानाच हे ट्विट राणेंच्या पोराने केलंय आणि पोरांचाच बाप आम्हाला शहाणपणा शिकवतोय आणि हे लोकांना आम्ही सांगायला लागलो तर कॅमेरा घेऊन आमच्यावरच… असे विधान करत अंधारे यांनी पोलीस खात्याचाही समाचार घेतला. सावरकरांबद्दल भाजपाला एवढेच प्रेम होते तर आतापर्यंत भाजपाने त्यांना भारतरत्न का जाहीर केलं नाही, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. जी जी जागा चांगली दिसली त्या ठिकाणी सातबारा माझा झाला पाहिजे. नाही झाला तर खोट्या केसेस टाकायला आम्ही तयार आहोत, असे म्हणत त्याने राणे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या लेकरांना काय समजावून सांगावं… कारण बाप समजदार असेल तर पोरं समजदार होतील, असे म्हणत राणेपुत्रांवरही अंधारे यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी विधानसभेतील फडणवीस यांच्या बद्दलच्या वक्तव्याचा व्हिडिओ जनतेसमोर सादर केला. अंधारे यांची ही सभा कणकवलीमध्ये राणे यांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्वच नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू करण्यात आला होता. यामुळे बोलण्याला मर्यादा येणार हे ओळखून अंधारे यांनी स्वतः टीका करणे टाळत विविध व्हिडिओ आणि ट्विटच्या माध्यमातून राणे आणि त्यांच्या मुलांना लक्ष केले. अंधारे यांच्या या राणे यांच्या होमपीचमधील नव्या राजकारणाने भाजपच्या गोटात देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.