मशाल भडकली आणि भगवा फडकला! आता भविष्यातील लढाईची चिंता नाही – उद्धव ठाकरे

कपट कारस्थान केल्यानंतर अंधेरीची ही पहिलीच निवडणूक झाली. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं, यामुळे नवीन निशाणी घेऊन आम्ही ही निवडणुक लढलो. परंतु अंधेरीमध्ये मशाल भडकली आणि भगवा फडकला, याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय हे शिवसैनिकांना आहेच. परंतु आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड अशा अनेक हितचिंतकांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार. लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता नाही, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके या प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्या. या विजयानंतर लटके यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत ज्याप्रमाणे आपण विजय खेचून आणला तसाच विजय आपल्याला भविष्यात देखील खेचून आणायचा आहे.

ज्यांच्या मागणीमुळे शिवसेनेचं चिन्ह गोठवलं, ते या निवडणुकीत फिरकलेही नाहीत. परंतु त्यांच्या कर्त्या करवीत्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर त्यांना पराभवाचा अंदाज आल्यावर त्यांनी माघार घेतली. भाजपने जर निवडणूक लढवली असती तर नोटाला मिळालेली मते त्यांना मिळाली असती. भाजपकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणे हा मूर्खपणा ठरेल. असा घणाघात ठाकरेंनी भाजप आणि बंडखोरांवर केला.

निवडणुकीसाठी चिन्ह हे महत्वाचे आहेच. ज्या धनुष्यबाणाची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोज पूजा करायचे, ते धनुष्यबाण आजही देव्हाऱ्यामध्ये आहे. हे धनुष्यबाण गोठवले गेले. परंतु चिन्हांपेक्षा वृत्ती महत्वाची असते. जनता चिन्हासोबत वृत्ती पाहून देखील मतदान करत असते. त्यामुळे चिन्ह कोणतेही असले तरी जनता आमच्या सोबत आहे. हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. धृतराष्ट्र आणि महाराष्ट्र यात फरक आहे, महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे विरोधकांनी माघार घेतल्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहावर पाणी पडलं तरीही मशाल भडकलीच. असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला ओरबाडून नेण्यात आले, आणि आता पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त व्हायला लागलं आहे. म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राला. या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्यापुर्वी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागतील हा माझा अंदाज आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा मी प्रयत्न करेन मात्र आमचे सर्व नेते या यात्रेत सहभागी होतील. असे ते म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh