देशातील कोरोना रुग्नसंखेत 5 महिन्यानंतर वाढ,24 तासात 20,139 नवे रुग्न,38 मृत्यु.

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०,१३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६,४८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सध्या देशात १ लाख ३६ हजार ७६ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने गुरुवारी दैनंदिन संसर्गदर ५.१० टक्क्यांवर पोहोचला. गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्या ही गेल्या ५ महिन्यांतील सर्वाधिक आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.देशात मंगळवारी दिवसभरात १६ हजार ९०६ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १५ हजार ४४७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४९ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ३.६८ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ४.२६ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९९ कोटी २७ लाख २७ हजार ५५९ डोस देण्यात आले आहेत. तर, ३.७६ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ५ कोटी १० लाख ९६ हजारांहून अधिक बुस्टर डोस देण्यात आले आहेत.

 

दरम्यान, १५ जुलैपासून पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता ६० वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. या मोहिमेचा आता विस्तार केला जात असून १८ वर्षावरील लोकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. १८ ते ५९ वयोगटातील लोकांची संख्या ७७ कोटी इतकी आहे. यापैकी एक टक्के लोकांनी देखील बूस्टर डोस घेतलेला नाही. याउलट ६० वर्षांवरील १६ कोटी लोकांपैकी सुमारे २६ टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले लोक तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम बूस्टर डोस देण्यात आला होता.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी ९ कोटी ९९ लाख १८ हजार ३३० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यत ८६ कोटी ७७ लाख ६९ हजार ५७४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ कोटी ५९ लाख ३०२ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.