चांडोळ व येवती वासियांना मोफत शिबिराच्या माध्यमातून आरोग्याचे कवच

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून आज बोदवड तालुक्यातील येवती आणि बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळे येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत ईसीजी कार्डिओग्राफ तपासणी, रक्‍तदाब, मधुमेहासह टू डी इको अर्थात हृदयाची सोनोग्राफीही अगदी विनामूल्य करण्यात आली. रिपोर्टनुसार शेकडो रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला असून रुग्णालयापर्यंत येण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे.

गोदावरी फाऊंडेशन आणि भा.रा.काँ.बोदवड तालुका क्राँग्रेस कमिटी यांच्या संयुक्‍त विद्यमाने बोदवड तालुक्यातील येवती येथे बुधवार, ६ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच शांताराम वाघ, माजी सरपंच पुरुषोत्‍तम (बाळू) पाटील, हितेश पाटील यांची विशेष उपस्थीती होती. याप्रसंगी मेडिसीन रेसिडेंट डॉ.आदित्य नांदेडकर, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, नेत्रविभागातील इंटर्न आशुतोष, स्त्रीरोग विभागातील सोनाली पाटील, ऑर्थोपेडिक डॉ.परिक्षीत पाटील, इंटर्न भाविका वर्मा, ओजस्वी सयाजी, भुषण यांनी रुग्णांची तपासणी केली, काहींना औषधोपचार तर काहींना गरजेनुसार शस्त्रक्रियेचा सल्‍ला देण्यात आला. तसेच रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड आणण्याचे आवाहन केले जेणेकरुन शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत उपचाराचा रुग्णांना लाभ घेता येईल.

चांडोळ शिबिरात १४२ तर येवती शिबिरात १३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून अनुक्रमे ६८ व ६३ रुग्णांना पुढील उपचारासाठी बोलाविण्यात आले आहे. त्यासाठी तारखा देण्यात आल्या असून वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. हे शिबिर नागरिकांसाठी आरोग्याचे कवच ठरले आहे.

शिबिर यशस्वीतेसाठी रत्नशेखर जैन, टि.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा तालुका अध्यक्ष युवक काँग्रेसचे पुंजाजी पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.