सध्याच्या युगात सोशल मीडियाव मोबाईलने संपूर्ण जगाला वेधले आहे. सेल्फी घेण्याचा मोह तर भल्याभल्यांना आवरत नाही. युवा वर्गाची वाढती क्रेझ पाहता लंघाणे ता. शिंदखेडा येथे सरपंच ललिताबाई जितेंद्रसिंग राजपूत यांच्या पुढाकाराने सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे. सेल्फी पाईंट बनवणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. हा पाईंट युवक व युवतींसाठी आकर्षण ठरत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील लंघाणे हे दोन हजार दोनशे लोकवस्तीचे गाव आहे. सरपंच ललिताबाई राजपूत व त्यांचे पती जितेंद्रसिंग राजपूत यांनी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्यापासून शासन स्तरावरुन वेगवेगळ्या योजना खेचून आणत आहेत. तालुक्यातील पहिले मोबाईल सेल्फी पॉईंट याच गावात सुरू झाल्याने लंघाणे गावाची ही नवीन ओळख आता पुढे आली आहे.
युवकांना आपल्या हक्काचे एक सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच ललिताबाई राजपूत व जितेंद्रसिंग राजपूत हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी लंघाणे येथे सेल्फी पॉईंट विकसित केला आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तहोत असतांना व त्यानंतर या ठिकाणी सेल्फी घेणार्या युवकांचा ओघ सुरू झाला आहे. सेल्फी घेणार्या युवक युवतींकडून आपले फोटो व्हाट्सअप स्टेटसवर किंवा इतर माध्यमांचा स्टेटस वर अपलोड होत असल्याने लंघाणे गावाचे नाव त्याचसोबत प्रसिद्ध होत आहे.
गावाच्या विकासात भर घालत सरपंच, ग्रामसेवक आदींच्या मेहनतीने सेल्फी पॉईंट उभारल्याने गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. म्हणून गावकर्यांतर्फे सरपंच प्रतिनिधी जितेंद्रसिंग गिरासे व ग्रामसेवक निलेश पाटील यांना हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच सत्तरआबा राजपूत, रंजीत राजपूत, सचिन राजपूत, गोपाल राजपूत, राहुल राजपूत, करण राजपूत, जयकुमार राजपूत, ईश्वर ठाकूर, संग्राम राजपूत, नरेंद्र ठाकूर व समस्त मेवाड रत्न ग्रुप उपस्थित होते.