ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर पालिका चाचण्या वाढविणार

मुंबई (प्रतिनिधी) : ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महापालिका चाचण्या वाढविणार आहे. गुरूवारी कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिका चाचण्या वाढविण्यावर भर देणार आहे.

एकीकडे मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनच्या भीतीमुळे महापालिकेने पुन्हा निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुंबईत होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढविण्यावर पालिका भर देणार आहे. खबरदारी म्हणून ५० हजारांपर्यंत चाचण्या वाढवण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत सध्या ३३ ते ३८ हजारांपर्यंत चाचण्या केल्या जातात. मात्र आता दररोज ५० हजारांपर्यंत चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान महापालिकेकडून लसीकरणाचा वेग देखील वाढविण्यात येणार आहे.

नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत, मास्क वापरावे आणि सोशल डिस्टन्सिंगवरच्या नियमाचे पालन करावे अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.