जिल्हा बँक निवडणूक ; नगराध्यक्ष रमण भोळेंसाठी आमदार संजय सावकारे माघार घेणार

जळगाव – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे डावपेच आता रंगात येऊ लागले आहेत. भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपचे आमदार संजय सावकारे या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार सुरु झाली आहे.

भुसावळ तालुक्याच्या राजकारणात रंजक कथा आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येतील असे जाणकारांना वाटते .भुसावळ शहराचे नगराध्यक्ष रमण भोळे हे भाजपच्या उमेदवारीवर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि आमदार संजय सावकारे हेही भाजपचे आमदार आहेत . तथापि या दोघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी असलेली जवळीक तालुक्याच्या राजकारणात जगजाहीर आहे दुसरीकडे प्रबळ उमेदवार समजले जाणारे माजी आमदार संतोष चौधरी यांचा या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने ते नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांकडे अपिलात गेलेले आहेत . माजी आमदार संतोष चौधरी यांच्या या अपिलावर उद्या ( २६ रोजी ) सुनावणी होणार आहे चौधरी यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी माघार घ्यावी आणि रमण भोळे यांना बळ द्यावे अशा हालचाली आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत , अशी चर्चा जोरदार सुरु झाली आहे .
भाजपचे आमदार संजय सावकारे आणि भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे हे दोघेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक समजले जात असल्याने जिल्ह्यातील भाजप नेते नेमके कसे डावपेच लढवतील याचीही उत्सुकता वाढली आहे. जाणकारांच्या मते भुसावळ तालुका सोसायटी मतदारसंघात जिल्हा बँकेचे २६ मतदार आहेत त्यापैकी १८ मतदार माजी आमदार संतोष चौधरी यांचे समर्थक समजले जात आहेत. त्यामुळे हे मतदार कोणता निर्णय घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. आमदार संजय सावकारे यांनी माघार घेतली तरी निर्णायक भूमिका माजी आमदार संतोष चौधरी यांचीच ठरू शकते त्यामुळे रमण भोळे यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे भाजपनेते शिष्टाई करतील का ? आणि कशी करतील ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

jalgaonsandesh

jalgaonsandesh