हिंदू असलो तरी अन्य धर्मियांचा आकस नाही – ना. गुलाबराव पाटील

रावेर -प्रत्येकाने धर्माभिमानी असावे, हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. मात्र याचा अर्थ इतर धर्मियांची कामे करू नये असा होत नाही. मी धरणगावातून मुस्लीम कार्यर्त्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष केले. बौद्ध सदस्याला पंचायत समिती सभापतीपद खुले असतांनाही सभापती केले. विकासकामांमध्ये भेद असता कामा नये. माझ्या आजवरच्या वाटचालीत हा भेद कधीही मानला नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. सावदा येथील खंडेराव देवस्थानाच्या सभामंडपाचे भूमिपुजन केल्यानंतर ते बोलत होते.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते खंडेराव देवस्थानाच्या सभा मंडपाचे भूमिपुजन करण्यात आले. देवस्थानातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विधिवत पूजन व कुदळ मारून कामास प्रारंभ करण्यात आला. कामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आमदारकी आणि नंतर मंत्रीपद मिळाले तरी कधीही बडेजाव मिरवत नाही. कधी पदांची हवा डोक्यात जाईल असे वागत नाही. समाजाची मते कमी असतांनाही मतदारसंघातील जनता फक्त आणि फक्त कामांच्या बळावर निवडून देते.
आमदार चंद्रकांत पाटील मतदारसंघात चांगली कामे करत असून बोदवडमधील जनतेची तहान भागविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आपले पाठबळ आहे. माझे काका येथे पीएसआय असल्याने लहानपणी दोन वर्षे मी सावद्यात राहिलेलो आहे. बालपणी या मंदिरावर आपण आईसोबत नेहमी येत होतो अशी आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. देवस्थानाची केलेली कामे प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात राहतात असेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला दोन वर्षांपासून गती मिळाल्याचे सांगितले. खंडेराव देवस्थानाच्या सभा मंडपासाठी राजेश वानखेडे यांनी सूचित केल्यानुसार आपण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय मांडला पालकमंत्र्यांनी तात्काळ याला मंजुरी दिली. सावदा येथे ७५ लाख रूपयांच्या पाण्याच्या टाकीच्या कामालाही मंजुरी मिळाली काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, नगराध्यक्षा अनिता येवेले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, स्वामीनारायण मंदिराचे कोठारी डीपी स्वामी ,शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, नगरसेवक किशोर बेंडाळे, पुजारी अशोक भगत, माजी नगराध्यक्षा सौ हेमांगी चौधरी, राहुल पवार, माजी नगरसेवक रवींद्र बेंडाळे, मोहनदास भंगाळे, नोमदास भंगाळे आदीची उपस्थिती होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh