आज पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम भागात एका भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. बर्फाच्छादित बाईसरण व्हॅलीमध्ये या हल्ल्याची घटना घडली असून ती केवळ पायी किंवा घोड्यावरूनच गाठता येते. घटनास्थळी गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सैन्याने तातडीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जखमींचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ही कारवाई अजूनही सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहशतवाद्यांनी जंगलात लपून बसून पर्यटकांवर अचानक गोळीबार केला. काही जण सैनिकी पोशाखात असल्याचेही सांगितले जात आहे. ही योजना पूर्वनियोजित आणि लक्ष केंद्रित करून केलेली असल्याचे दिसते.
हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली व त्यांनी श्रीनगरला जाऊन सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अमित शहा काही तासांतच श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.
दिल्लीतील आपल्या निवासस्थानी अमित शहा यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तसेच लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांगितले की, “हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असून, दोषींना त्याच्या परिणामांचा जबरदस्त फटका बसणार आहे. सुरक्षाबलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली असून दोषींना शिक्षा होईपर्यंत विश्रांती नाही.”
पहलगाम हे पर्यटकांचे एक अतिशय प्रसिद्ध स्थळ आहे, जेथे दरवर्षी हजारो पर्यटक सहलीसाठी येतात. हिमाच्छादित डोंगर, नद्या, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरण हे या परिसराचे आकर्षण आहे. परंतु या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.
या हल्ल्यात कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक ठार झाला असून, त्याच्याच पत्नी आणि मुलासमोर त्याला गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना अधिक धक्कादायक ठरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी याची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सामाजिक माध्यमांवरून नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
सध्या संपूर्ण बाईसरण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. कमांडो तैनात करण्यात आले असून, जंगलात शोधमोहीम सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटन बंद केल्याची माहिती दिली आहे.