आता ‘आपलं सेवा केंद्रा’तून होणार नाही ‘लाडकी बहीण’ची नोंदणी; सरकारनं का घेतला निर्णय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत.

तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भातील जीआर काढला आहे. पण यामुळं आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

केंद्र चालकांमध्ये नाराजी

शासनानं ‘आपलं सेवा केंद्र’ चालकांना विश्वासात न घेता थकीत मानधन न देता हा निर्णय घेतला असा आरोप केंद्र चालकांनी केला आहे. आत्तापर्यंत ‘आपले सेवा केंद्रां’नी लाडकी बहिण योजनेच्या ज्या नोंदणी केल्या आहेत. त्याचं मानधन शासनानं आम्हाला दिलेलं नाही. तसंच आता आम्हाला विश्वासात न घेताच हा निर्णय राज्य शासनाने घेतला.

यांच्याकडून अर्ज स्विकारण्याचे अधिकार आज पासून रद्द

आशा सेविका

सेतू सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्र

समूह संघटक

सीआरपी अंतर्गत शहरी-ग्रामीण लाईव्हलिहूड मिशन

मदत कक्ष प्रमुख

सिटी मिशन मॅनेजर

ग्राम सेवक

शासनानं का घेतला निर्णय?

आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढं मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम आंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे. या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे.

या योजनेंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलं आहे.

ताजा खबरें