जिल्हा होमगार्डपदासाठी रिक्त ३२५ जागांसाठी नवीन होमगार्ड सदस्य भरती प्रक्रिया सुरू आहे. २५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या २१ हजार २३४ आहे.
पोलिस दलाप्रमाणे आता होमगार्डसाठीही चुरशीची स्पर्धा होणार आहे.
जिल्हा होमगार्ड कार्यालयातर्फे निर्धारित ३२५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल २१ हजार २३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून पुढील आठवड्यापासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले.
त्यानुसार नोंदणी झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मैदाणी चाचणी गुरुवारी (ता. २९)पासून ते ३ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे.
नोंदणी केलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला, वेळी व ठिकाणी नोंदणी अर्ज, दोन पासपोर्ट फोटो, मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे. ही भरती फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच आहे. बाहेरील जिल्ह्यातील नोंदणी झालेले अर्ज व अनुशेष नसलेल्या ठिकाणी केलेले अर्ज बाद करण्यात आले आहेत. अशा उमेदवारांनी उपस्थित राहू नये, असे अप्पर पोलिस अधीक्षक नखाते यांनी कळविले आहे.
बेरोजगार तरुणांना आसरा
२३४ रिक्त पदांसाठी तब्बल २१ हजार २३४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यावरून नोकरीची अपेक्षा असलेल्या बेरोजगार तरुणांच्या संख्येचा सहज अंदाज येतो. पोलिस होण्याची इच्छा असूनही भरती होऊ न शकलेल्या तरुणांचा अर्जदारांमध्ये सर्वाधिक समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. होमगार्ड जवान, सेनेतील निवृत्त जवानांना पोलिस भरतीसाठी सवलत मिळत असल्याने होमगार्ड सदस्य भरतीसाठी अर्जदारांची संख्या वाढल्याचेही सांगण्यात आले.