नेपाळमध्ये भीषण अपघात, हिंदुस्थानी प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; 14 ठार

नेपाळमध्ये भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. हिंदुस्थानी प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस मर्श्यांगडी नदीमध्ये कोसळली. तनहून जिल्ह्यातील आयना पहारा भागात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोखराहून नेपाळची राजधानी काठमांडूच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या बसचा (क्र. यूपीएफटी 7623) तनहून जिल्ह्यात अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट 100 ते 150 फूट खोल नदीमध्ये कोसळली. या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी होते. सध्या येथे बचावकार्य सुद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती तनहूनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली.

अपघाताची माहिती मिलताच एसएसपी माधव पौडेल यांच्या मार्गदर्शनाखाली 45 पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू झाले. या बस दुर्घटनेमध्ये 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, अपघात झालेल्या बसमधील हिंदुस्थानी प्रवासी पोखरा येथील मझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही बस पोखरा येथून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. मात्र वाटेतच बसचा अपघात झाला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh