बदलापुरचा उद्रेक! दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट

शाळेच्या गेटवर मोठी गर्दी; शेकडो पालकांचा ठिय्या

मुंबई : बदलापुरमधून  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापुरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परिसरातील नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे बदलापुरकर आक्रमक झाले असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली, त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालकांची मोठी गर्दी जमली असून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केले होते. याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले आहेत. आज सकाळपासूनच पालकांसह शेकडो नागरिकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ‘शाळेने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत’ अशा पालक आणि बदलापुरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ज्या शाळेत हा प्रकार घडला आहे त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षका, मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास लावले, असा आरोप पालकांनी केला. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी शाळेने माफीनामादेखील दिला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh