कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहि‍णींचे अर्ज रद्द होणार? ‘त्या’ मेसेजवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे. आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

लाभार्थी बहि‍णींना या कार्यक्रमाला आणले जाणार असू लाभार्थी महिलांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी केलेली असतानाच एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवर हा मेसेज पोस्ट केला आहे.

काय आहे मेसेजमध्ये?

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सॲप मेसेज एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या मेसेजमध्ये लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे अर्ज रद्द केले जातील, असे या मेसेजमध्ये लिहिलेले आहे. या मेसेजनंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.’

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९० लाख महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे वितरीत करण्यात आले आहेत.