कोलकाता हत्याकांडाच्या निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टरांचा संप!

पाहा कोणत्या सेवा राहणार बंद?

मुंबई : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची अत्याचारानंतर  हत्या करण्यात आल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आज संप (Doctor Strike) पुकारला आहे. या प्रकरणी आधीही दोन दिवस संप केला होता. मात्र त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मिटवण्यात आला. दरम्यान, दिल्ली एम्समध्ये डॉक्टरांनी कँडल मार्च काढला त्यामध्ये डॉक्टरांनी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकातामधील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपावर असणार आहेत. या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहतील. २४ तासांच्या या संपामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

कोणत्या सेवा बंद?

डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असे मत व्यक्त करत मृत महिला डॉक्टरला न्याय, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा आदी मागण्या घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. या संपकाळात बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) तसेच नियोजित शस्त्रक्रिया बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत.