Rice ATM आता रेशनसाठी रांगा लावण्याची गरज नाही; ‘या’ राज्यात उघडले पहिले केंद्र

आपण आजवर ATM चा वापर पैसे काढण्यासाठी किंवा काही गावांमध्ये पाण्यासाठी केलेला पाहिला आहे. पण तुम्ही कधी ATM मधून धान्य काढताना पाहिलं आहे का? आता ओडिशातील ATM मधून नागरिकांना धान्य वितरित करता येणार आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता अन्न वितरण क्षेत्रात देखील मोठी मदत मिळणार असून हिंदुस्थानला पहिले ‘Rice ATM’ उभारण्यात आले आहे.

ओडिशा सरकारचे अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्णचंद्र पात्रा यांनी गुरुवारी भुवनेश्वरच्या मंचेश्वर भागातील एका गोदामात पहिले राइस ATM लॉन्च केले. आता ग्राहकांना रेशनमधून धान्य घेण्यासाठी तासंतास रांगा लावण्याची गरज भासणार नाही. ओडिशामधील या नव्या उपक्रमामुळे ग्राहकांना आता योग्य मापात धान्य मिळणार आहे. रेशनकार्डधारक Rice ATM मधून एकावेळी 25 किलो तांदूळ काढू शकतात. यासाठी ग्राहकांना एटीएमच्या डिस्प्लेवर रेशनकार्डधार क्रमांक टाकावा लागेल.

अन्न पुरवठा मंत्र्यांनी देखील नव्या उपक्रमाबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे. हे हिंदुस्थानातील पहिले Rice ATM आहे. जर या उपक्रमात आम्हाला यश आले तर येत्या काही दिवसांत सर्व जिल्हा मुख्यालयात असेच Rice ATM बसवले जातील. दरम्यान तुम्हा सर्वांना सेवा पुरवण्याआधी आम्ही रेशनकार्ड लाभार्थींसाठी Rice ATM ची चाचणी देखीव घेतली आहे. आता लाभार्थ्यांना योग्य वजनात तांदूळ मिळू शकणार असून रेशनसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच यामुळे फसवणूक करणाऱ्या तांदूळ विक्रेत्यांपासून लाभार्थ्यांची सुटका होणार आहे, असे कृष्णचंद्र पात्रा यांनी स्पष्ट केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh