कुलगुरूंच्या पुतण्याने घेतला राहत्या घरात गळफास

आजी ओट्यावर बसलेली अन नातवाने घरात संपविले जीवन

जळगाव -: तालुक्यातील धामणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पियुष रमेश गोसावी (वय २२, रा.धामणगाव ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून तो गावामध्ये आई, आजी, आजोबा यांच्यासह राहत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पियुष गोसावी हा शेती काम करून उदरनिर्वाह करीत होता. मयत तरुण हा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांचा पुतण्या आहे.

दरम्यान, बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेनंतर तो घरी आला, त्यावेळेला त्याची आजी ओट्यावर बसलेली होती. पियुषने घरात जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने आजी घरात गेली त्यावेळेला तिला ही घटना समजली. दरम्यान ममुराबाद गावात बँकेच्या कामाला गेलेली त्याची आई देखील परतली. त्यावेळेला तिने हंबरडा फोडला. ग्रामस्थांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता. त्यास वैद्यकीय अधिकारींनी मयत घोषित केले. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh