जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी (जीएमसी) आतापर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने दोन्ही रुग्णालयांच्या अत्याधुनिकरणासाठी ५० कोटींपेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजनमधून (डीपीडीसी) मंजूर झाला आहे.
आता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार १५ कोटी निधीतून अत्याधुनिक १२८ स्लाईसची सीटी स्कॅन मशीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतानुसार नुकतीच प्रशाकीय मान्यता दिली आहे.
त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता सर्व यंत्रांनी सज्ज झाले आहे. दुर्धर आजारावरही आता निदान होईल. त्यातून शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या आरोग्याला संजीवनी मिळेल, याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुने सीटी स्कॅन मशीन १६ स्लाईसचे असल्यामुळे रुग्णांच्या निदानात अडचण येत होती. १२८ स्लाईसचे मशीन शरीराच्या तपशीलवार आणि अचूक प्रतिमा तयार करीत असल्याने रुग्णांमधील रोगांचे निदान करण्यासाठी फायदा होणार आहे.