जळगाव – जिल्ह्यातील निधी वाटपावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यात खटके उडाले होते. पण आता गिरीश महाजन यांनी पर्यटन विकासासाठी स्वतःच्याच पर्यटन खात्याचा तब्बल 32 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जळगावकडे वळवून घेतला आहे. मात्र धाराशीव जिल्ह्याची फक्त वीस लाख रुपयांच्या निधीवर बोळवण करण्यात आली आहे.
महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून असंतोष आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांच्या जिल्ह्याला निधी वाटपात झुकते माफ दिले जात असल्याची भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची तक्रार आहे. दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून वित्त मंत्री अजित पवार व ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यात खटके उडले होते.
गिरीश महाजन यांनी रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाकडे अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यावर पैसे कुठून आणू? आता काय जमिनी विकायच्या का, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे आता गिरीश महाजन यांनी आता स्वतःच्या अखत्यारितील पर्यटन विभागाकडील सर्वाधिक निधी जळगाव जिल्ह्यातील पर्यटनासाठी घेतला आहे
53 कोटींच्या खर्चास मान्यता
पर्यटन विकास योजने अंतर्गत राज्यभरातील एकूण 26 ठिकाणच्या 28 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यासाठी एकूण 53 कोटी 53 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. यापैकी एकटय़ा जळगाव जिल्ह्यातील कामांसाठी 32 कोटी 50 लाखांचा निधी दिला जाणार आहे.
जिल्हा कामे निधी (कोटीमध्ये)
जळगाव 32 कोटी 50 लाख
सोलापूर 23 कोटी
बीड 22 कोटी 75 लाख
नाशिक 26 कोटी 98 लाख
सातारा 12 कोटी
वाशीम 11 कोटी 50 लाख
नागपूर 11 कोटी
धाराशीव 21 लाख रुपये