देश कमळाच्या रुपातल्या चक्रव्युहात अडकलाय, संसदेत राहुल गांधींची तुफान फटकेबाजी

देश कमळाच्या रुपातल्या चक्रव्युहात अडकला आहे. सहा जण हे चक्रव्युहाच्या केंद्रस्थानी आहे असा घणाघात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात सहा जणांनी अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवले होते. चक्रव्युहला पद्मव्युहसुद्धा म्हणतात. त्याचा अर्थ कमळ असाही होतो. 21 व्या शतकात एक नवे चक्रव्युह निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर कमळाचे चिन्ह मिरवतात. जे अभिमन्यूसोबत झालं ते आताच्या भारतात तरुणांसोबत, शेतकऱ्यांसोबत, महिलांसोबत आणि छोट्या-मध्यम व्यापाऱ्यांसोबत होत आहे. आजचे हे चक्रव्युह सहा लोकांकडून नियंत्रित केले जात आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी ही लोकं चक्रव्युह नियंत्रित करतात असे राहुल गांधी म्हणाले.

2024-25 च्या अर्थसंकल्पावर राहुल गांधी म्हणाले की मक्तेदारी आणखीन मजबूत करण्याचा या अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे. या अर्थसंकल्पामुळे तरुण, गरीब, शेतकऱ्यांना बळ मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण या अर्थसंकल्पामुळे संपत्तीवरची मक्तेदारी आणखी मजबूत होणार आहे अशी टीकाही गांधी यांनी केली. इंडिया आघाडी MSP चा कायदा या सभागृहात पारित करणार असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh