सुनसगाव येथील तलाठी कार्यालयाच्या इमारतीला उद्घाटनाच्या अगोदरच गळती ? ( निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना )

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे नवीन तलाठी कार्यालय बांधकाम सुरू होते विशेष म्हणजे वाघुर नदीच्या रेतीचा सर्रास वापर या बांधकामासाठी करण्यात आला सुरवाती पासूनच कामात कुचराई केली जात होती त्यामुळे आता उद्घाटनाच्या अगोदरच इमारतीला गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बाबत माहिती अशी की , येथील बेलव्हाळ रस्त्यावर सामाजिक सभागृहाच्या बाजूला नविन तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे आज रोजी बांधकाम पूर्ण झाले असून इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे मात्र पहिल्याच पावसाच्या पाण्यात इमारती मध्ये गळती लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी पाहिले त्यामुळे ही इमारत किती वर्ष टिकणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या कार्यालयात परिसरातील गावांचे आणि सुनसगाव चे महत्वाचे महसूल चे कागदपत्रे राहणार असल्याने आताच जर गळती लागली तर पुढे काय होणार ?

असा प्रश्न विचारला जातो आहे.

या इमारतीच्या बांधकामासाठी वाघुर नदीच्या रेतीचा सर्रास वापर केला आहे काम सुरू असताना एकाही जबाबदार अधिकाऱ्यांने रेती ची चौकशी केली नाही त्यामुळे काहीतरी गौडबंगाल असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून किमान ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तलाठी कार्यालयाचे एन ओसी देताना काळजीपूर्वक विचार करावा अन्यथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशी चर्चा गावात सुरू आहे. तसेच ज्यावेळी तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू होते त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली की नाही.आणि पाहणी केली असेल तर निकृष्ट रेती स्लॅब साठी का वापरु दिली ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नविन तलाठी कार्यालय गळती बाबत संबंधित ठेकेदार यांच्या कडे गावातील एका पदाधिकाऱ्याने माहिती दिली असता स्लॅब वर पाण्याचे आळे केलेले असल्याने त्या अळ्यात पावसाचे पाणी साठल्याने छताला ओलसरपणा आला असावा असे सांगितल्याचे समजते.

मात्र, ग्रामस्थांचे म्हणणे आहे की भिंती किंवा इतर बांधकामासाठी वाघुर नदीच्या रेतीचा वापर केला जातो परंतु स्लॅब आणि प्लास्टर करायचे असेल तर गिरणा रेतीचा वापर करावा लागतो त्यामुळे बांधकाम अनेक वर्षे टिकून राहते. परंतु ग्रामस्थांना विचारणार कोण ? ‘ ज्याच्या हाती ससा तो पारधी ‘ आणि ‘ जो तळं राखेल तो पाणी चाखेल ‘ या म्हणी याठिकाणी लागू होत असल्याचे बोलले जात असून किमान आ. संजयभाऊ सावकारे यांनी या नवीन तलाठी कार्यालयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी केली जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh