डेंग्यूवर लस येतेय! 10 हजार लोकांवर होणार चाचणी

पावसाळा आला की डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. यामुळे मृत्यूही होतात. खूशखबर म्हणजे आता डेंग्यूला रोखण्यासाठी लस तयार करण्यात आली असून याची चाचणी 10335 नागरिकांवर घेण्यात येणार आहे. डेंगीऑल नावाची लस बनवण्यात आली असून तिची चाचणी 18 ते 60 वर्षांच्या व्यक्तींवर केली जाणार आहे. पॅनेसिया बायोटेकने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या मदतीने ही लस बनवली आहे. या लसीची देशभरात 19 ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे.

चार प्रकारच्या विषाणूंवर लस प्रभावी

पॅनेसिया बायोटेकने एका अमेरिकन संस्थेसोबत करार करून स्वदेशी लस तयार केली आहे. निष्क्रिय घटक वगळता लसीची विषाणू रचना एनआयएच लसीसारखी आहे. या लसीच्या चाचणीचा निकाल सुरुवातीच्या टप्प्यात आशादायक दिसून आलाय. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंवर ही लस प्रभावी ठरणार आहे. एकाच लसीमध्ये चारही विषाणूंची संरचना उपलब्ध आहे. यातून विषाणूजन्य जनुकांचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे या लसीमुळे स्वतःहून डेंग्यू होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.