रेशनकार्ड धारकांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवात मिळणार ‘आनंदाचा शिधा’

दीड कोटीहून अधिक कुटुंबांना होणार लाभ

राज्यातील रेशनकार्ड  धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारक सर्व नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असा ठराव मांडला होता. त्यानुसार ११मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता गणेशोत्सवातही राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारक नागरिकांचा यंदाचा गणेशोत्सव आणखी उत्साहदायक होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. याबाबत ⁠राज्य सरकारकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल १ कोटी ७० लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. या वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसांत पूर्ण करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

आनंदाच्या शिध्यात मिळणार या गोष्टी

गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप हा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात होणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh