जळगाव – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावच्या गजानन भिका वराडे यांच्या मुलीने जीवन संपवलं आहे. 24 वर्षांच्या जागृतीने मोबाईलमध्ये नोट लिहून तिची सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं आहे.
यानंतर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जागृतीच्या पार्थिवाला अग्नी द्यायला तिच्या नवऱ्याने नकार दिल्यानंतर तिचा भाऊ विशाल वराडे याने बहिणीवर अंत्यसंस्कार केले.
कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी (वय 32) सोबत दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिला. भुसावळच्या आदित्य मंगल कार्यालयात जागृती आणि सागरचं धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नात मुलगा सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आली.
सागर हा मुंबई पोलीस कर्मचारी आहे. सागरचे मित्र लग्नाला येणार असल्यामुळे एसी हॉलही बुक केला होता. लग्नात वराडे कुटुंबाने 7 लाखांपेक्षा जास्त खर्च केला. त्यानंतर मुलगी 21 जूनला मुंबईत पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेला. जागृतीचे आई-वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली, तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे.
सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाहीत. हंगाम आल्यावर मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं आम्ही सांगितलं, त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली, असं वराडे कुटुंबाने सांगितलं. यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला असं जागृतीच्या पतीने सागरला सांगितलं आणि फोन कट केला.
जागृतीच्या पतीचा फोन आल्यानंतर तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक मुंबईला आले. यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक आणि मानसिक छळ करणं, असे गुन्हे जागृतीचा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत.
जागृतीशी काय बोलणं झालं?
दरम्यान जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं आहे. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस, मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असं जागृती आपल्याला म्हणाल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे.
जागृतीचा पती मुंबई पोलिसांमध्ये कर्मचारी आहे. सागर आईसोबत डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत होता. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं, त्याआधी तिने मोबाईलमध्ये नोट लिहिली.
मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला लॉक ओपन करता आलं नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं होतं. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिने बाहेरून घराला कुलूप लावलं, यानंतर जागृती 200 लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन फॅनखाली उभी राहिली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास लावून घेतला.
‘माझ्या मुलीला टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि नवऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा मिळाली तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल तसंच अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांवर लगाम लागेल आणि भविष्यात अशी घटना घडणार नाही’, अशी प्रतिक्रिया जागृतीचे वडील गजानन वराडे यांनी दिली आहे.