जामनेर पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाची तुफान दगडफेक, पीआयसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी

जळगाव – जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीस अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती.

मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. या घटनेत पीआयसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला फार मोठी दुखापत झालेली नाही. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मायनर फ्रॅक्चर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील बालिकेवर अत्याचार करत तिचा खून करून संशयित आरोपी सुभाष भील हा फरार झाला होता. अखेर सुभाष भील याला गुरुवारी भुसावळच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी जमावाने आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र यावेळी आम्ही याप्रकरणात योग्य ती कारवाई करु, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी जमावाला केले. मात्र, जमावाकडून पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. गुरुवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही घडली.

या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात पीआय किरण शिंदे यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेने जामनेरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली,तोडफोड केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.