चित्रपट येण्यापूर्वी महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हते; नरेंद्र मोदींच्या विधानाने चिघळणार वाद

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि मवाळ विचारांचा पुरस्कार करत अहिंसेच्या मार्गाने लढा देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना महात्मा आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार देणाऱ्या महात्मा गांधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे. या विधानामुळे महात्मा गांधी यांचा अवमान झाला आहे, अशी भावनाही काहीजण व्यक्त करत आहेत.

महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनवण्यात आला, त्यानंतर जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झाले. त्याआधी त्यांना कोणीही ओळखत नव्हते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यांनी याबाबतचे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी 75 वर्षांत काहीही प्रयत्न झाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी हे आपल्या देशातील महान व्यक्तिमत्त्व होते. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणीही ओळखत नव्हते. महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर महात्मा गांधी आणि गांधी विचार यांची जगाला ओळख झाली. जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांची ओळखना आहे. महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून देशाला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.