जळगावातील दरोडा प्रकरणात तीन भावांना अटक

जळगाव – सोमवारी जळगाव शहरातील सराफा बाजारातील सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत ६ दरोडेखोरांनी ३२ लाखांचे दागिने आणि रोकड चोरू नेल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती . पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत एकाला पुण्यातून तर दोघांना जळगावातून ताब्यात घेण्यात आले होते . विशेष म्हणजे हे तीन संशयित सखे भाऊ निघाले असून त्यांचे तीन अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे . दरम्यान तिघांना २१ रोजी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भवानी पेठ येथे सौरभ कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये मागच्या बाजूने दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकीत सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते. येथील दोन कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविण्यात आला होता. दरोडेखोर दरोडा यशस्वी करून पसार झाले होते. दरम्यान, ज्वेलर्सच्या दुकानातील मागील बाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सहा जण दिसून येत होते. त्या आधारे शनीपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्त विद्यमाने तपास केला.

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर जवळ असलेल्या राजीव गांधी नगर येथील तीन सख्खे भाऊ रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२), सागरसिंग जीवनसिंग जुन्नी (वय २५), झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (वय २२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे. यातील रणजीतसिंग याला पुण्यातून तर दोघांना जळगावतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मंगळवारी दि. २१ मे रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे तिघांना दि. २७ मे पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एलसीबीचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम, शनिपेठचे प्रभारी निरीक्षक विठ्ठल पाटील, तपास अधिकारी पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या दरोड्यामध्ये चार संशयित आरोपी जळगावचे तर दोन बाहेर जिल्ह्यातील असल्याचे समजून येत आहे.