नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडे तीन कोटींचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई – घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. या रोड शोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले होते. मोदींच्या रोड शोमुळे झालेले मुंबईकरांचे हाल कमी होते की काय आता त्या रोड शो चा खर्च देखील मुंबईकरांच्या खिशातून झाल्याची चर्चा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रो़ शो साठी तब्बल साडे तीन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले असून हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

देशात ‘चारशे पार’चा नारा दिला असला तरी याआधी दोन वेळा झालेल्या प्रचंड फसवणुकीमुळे जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पायाखालची वाळू सरकलेल्या मोदींकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. खुद्द नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सुमारे 25 जाहीर सभा घेतल्या. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मोदी यांचा घाटकोपर येथे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो आयोजित केला होता. या रोड शोसाठी मुंबईतीलव अनेक रस्त्यांचे काम करण्यात आले होते, पोलिसांची अधिक कुमक बोलावण्यात आलेली, बॅऱिकेड्स लावण्यात आलेले.

”मुंबई महापालिकेने या रोड शोसाठी तीन कोटी 56 लाख रुपये खर्च केले आहेत. हा भाजपचा खासगी रोड शो होता तरी देखील करदात्यांच्या पैशातून याचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय़ राऊत यांनी केली आहे.