चारधाम यात्रेत रील बनवण्यावर बंदी; उत्तराखंड सरकारचा आदेश जारी

उत्तराखंडची पवित्र चार धाम यात्रा 10 मे पासून सुरू झाली आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. या यात्रेसाठी अनेक लोकांनी काही महिन्यांपूर्वींच बुकींग केले होते. दरम्यान, उत्तराखंड सरकारने भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. चारधाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना 50 मीटरच्या परिघात व्हिडिओ रील्स बनविण्यास बंदी घातली आहे.

उत्तराखंड सरकारने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. राज्यात चारधाम यात्रा सुरळीतपणे पार पडणे गरजेचे आहे. या यात्रेसाठी सर्व राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. यात्रेकरूंना शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी राज्य सरकारकडून व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सध्या मंदिर परिसरात काही व्यक्ती सोशल मीडियासाठी व्हिडिओग्राफी/रील्स बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा खोळंबा होत आहे. भाविकांची सोय लक्षात घेऊन चारधाम येथील मंदिर परिसराच्या 50 मीटरच्या परिघात सोशल मीडियावर व्हिडिओग्राफी/रील्स बनविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ‘चार धाम यात्रेसंदर्भात मी सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यात्रेसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांना भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येने यात्रेच्या सुरुवातीच्या पहिल्या सहा दिवसांत मागील वर्षांचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे’, असे आवाहन मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी केले आहे.