हैदराबादमध्ये येते कोण अडवते बघतेच…, नवनीत राणा यांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

तेलंगणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजप (BJP) आणि एमआयएममध्ये (MIM) चांगलाच वाद रंगला आहे. भाजपच्या खासदार नवनीत राणा यांच्या ‘१५ सेकंदासाठी पोलिसांना हटवा’ या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी जोरदार टीका केली.

‘त्यांना १ तास द्या’, असे उत्तर ओवैसींनी दिले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर करत नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना थेट इशारा दिला आहे. ‘लवकरच हैदराबादमध्ये येते कोण अडवते बघते.’, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी थेट ओवैसी बंधूंना इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ‘एका मंचावर मोठ्या ओवैसीने मोठ्या उत्साहात सांगितले होते की, मी छोट्या भावाला दाबून ठेवले आहे आणि आमचा छोटा तोफ आहे. मी तुम्हाला सांगते बडे अशा तोफेला आम्ही घराबाहेर सजावटीसाठी ठेवतो. मोठा ओवेसी म्हणतो आमचा छोटा खुंखार आहे. अरे असे खुंखार आम्ही घरात पाळतो.’

तसंच, ‘हे लक्षात ठेवा की मी सुद्धा माजी सैनिकाची मुलगी आहे. मला सुद्धा बघायचे आहे की कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू कधीपर्यंत खैर मनवते. मोठा म्हणतो की मी छोट्याला सांभाळून ठेवले आहे आणि त्याला समजावून सांगितले आहे. म्हणून तो तुझ्या डोळ्यासमोर आहे. नाहीतर आज राम भक्त आणि मोदीजींचे शेर प्रत्येक गल्लीत फिरत आहेत. दाबून ठेवले आहे म्हणून तो डोळ्यासमोर आहे. मी लवकरच हैदराबादमध्ये येत आहे आणि मी बघतेच मला कोण अडवते.’, असे म्हणत नवनीत राणा यांनी ओवैसी यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, बुधवारी हैदराबादमध्ये नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवैसीच्या 15 मिनिटांच्या उत्तरात ‘आम्हाला’ 15 सेकंद देण्याचे वक्तव्य केले होते. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना असदुद्दीन यांनी ‘छोट्याला मोकळे सोडले तर तो कोणाचेही ऐकत नाही,’ असे वक्तव्य केले होते. ओवैसींनी सांगितले की, ‘देश पाहून मी गप्प बसलो. जर डोकं फिरलं तर ते पूर्णपणे फिरेल. हे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुम्हाला हवं ते बोलत राहाल? मलाही तोंड आहे.’

तसंच, ‘महाराष्ट्रातून आलेल्या या लाडक्या खासदार छोट्या छोट्या गोष्टी करत आहेत. अहो, मी छोट्याला (अकबरुद्दीन ओवैसी) दाबून ठेवले आहे. ज्या दिवशी मी छोट्याला सांगेल की मी आराम करतो तू सांभाळून घे. तेव्हा तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. छोटा कसा आहे हे तुम्हाला माहिती नाही.’

jalgaonsandesh

jalgaonsandesh