‘कपाळावर लिहिलंय, माझा बाप गद्दार.’, प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेमुळे वातावरण तापलं

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातलं विशेषत: मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

खरंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्याची निवडणूक थोडी वेगळी आहे. कारण शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवलं जात आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील आपल्या भाषणात अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. चतुर्वेदी यांनी ज्या शैलीत ही टीका केलीय त्यामुळे शिंदे गटाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत.

प्रियंका चतुर्वेदी “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू?” म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी “गद्दार, गद्दार” अशी ओरडत होती. “ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार”, असं प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या. प्रियंका चतुर्वेदी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ चित्रपटाचा उल्लेख केला. “’दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसंच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’”, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

शितल म्हात्रे यांचं प्रियंका चतुर्वेदींना प्रत्युत्तर

प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली ही टीका शिवसेना शिंदे गटाला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या विविध नेत्यांकडून प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे तिकिट न मिळाल्यामुळे प्रियांका चतुर्वेदी पिसाळल्या आहेत. उद्धव ठाकरेंचे कोव्हीड घोटाळ्याचे कागद देऊन त्याबदल्यात खासदारकीची डील प्रियंका चतुर्वेदी करत होत्या”, असा खळबळजनक दावा शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. “श्रीकांत शिंदे यांनी पक्षात प्रवेश न दिल्याने प्रियंका चतुर्वेदी वैयक्तिक टीका करत आहेत”, असा देखील दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे.

संजय निरुपम यांची आदित्य ठाकरेंवर टीका

दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेनेत सहभागी झालेले नेते संजय निरुपम यांनीदेखील प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसेना उबाठा गटाच्या महिला खासदाराने एकनाथ शिदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल अतिशय अभद्र अशी टिप्पणी केली आहे. माझे वडील गद्दार आहेत हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे, असं लिहिलं असेल तर मग आदित्य ठाकरे यांच्याही कपाळावर लिहिले पाहिजे की, माझा बाप महागद्दार आहे. कारण त्यांच्या वडिलांनी भाजपसोबत युती तोडून गद्दारी केली आहे”, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे.